१९ सुवर्ण, १६ राैप्य, १८ कांस्य पदकांसह १,०१९ गुणवंतांना पदवी श्री हव्याप्र मंडळाचे शैक्षणिक धोरण देशासाठी आदर्श : कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले श्री हव्याप्र मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयाचा ९ वा दिक्षांत समारंभ थाटात

October 12, 2023

अमरावती दि.१२ : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांनी काही दशकांपूर्वीच देशातील पारंपारीक शैक्षणिक पद्धतीमध्ये परिवर्तन साधण्याचे सुचवले हाेते. मात्र त्यावर दुर्लक्ष हाेत गेले, परिणामी आधुनिक युगामध्ये शिक्षण क्षेत्र वेगाने व्यापक हाेत असतांना राेजगाराच्या संधी मात्र संकुचीत हाेत असल्याचे वास्तव समोर आहे. शासकीय नाेकरीचा विचार करता १ टक्के केंद्रीय तर ५ टक्के राज्य शासन असे केवळ ६ टक्के शासकीय नाेकरी. आता त्यामध्येही कंत्राटी पद्धतीचा विचार सुरू असल्याने आजच्या युवकांसमाेर राेजगाराचा प्रश्न गंभीर होत आहे. केवळ पदवी मिळवल्याने यश गाठता येते ही संकल्पना आता जुनी झाली आहे. पदवी साेबतच काैशल्य प्रधान शिक्षणाला महत्व प्राप्त होत आहे. याबाबत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने मागील अनेक दशकांपासून राबविलेले शैक्षणिक व क्रीडा धाेरण आज शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरले आहे. एक स्वायत्त महाविद्यालय म्हणून मंडळाचे डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाने बदलत्या परिस्थितीचे मुल्यांकन करीत शारीरिक शिक्षणासहीत सर्व अभ्यासक्रमांना क्रीडा व कौशल्याची जोड दिली आहे. परिणामी मंडळातील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवनवीन किर्तीमान स्थापीत करीत आहेत. तोच वारसा पुढे नेण्यासाठी नवीन फळी सज्ज झाली आहे याचे समाधान आहे. एकूणच आजचे शिक्षण व रोजगाराची परिस्थिती पाहता शारीरिक शिक्षणाला महत्व प्राप्त होत आहे. मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयाने साकारलेले शैक्षणिक धाेरण येथील विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणाला चालना देत असून असे शैक्षणिक क्रीडा धाेरण देशासाठी आदर्श मार्गदर्शक असल्याचे मत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालीत स्वायत्त डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचा ९ वा दिक्षांत समारंभ बुधवार दि.११ ऑक्टोबर राेजी मंडळाच्या स्व. साेमश्वर पुसतकर सभागृह येथे सकाळी ११ वाजता आयाेजीत करण्यात आला होता. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले उपस्थित हाेते. मार्गदर्शक पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्यासह प्रमुख अतिथी महासंचालक तंत्र शिक्षण चे डाॅ. व्ही. आर मानकर, उच्च शिक्षण महासंचालक अमरावती विभागाच्या डाॅ.नलिनी टेंभेकर, प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, मंडळाच्या सचिव व उपप्राचार्य डाॅ. माधुरीताई चेंडके, सचिव डॉ. विकास कोळेश्वर, परीक्षा नियंत्रक डाॅ. विजय पांडे, डाॅ. बेलसरे, डाॅ. सुनील लाबडे, डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, डाॅ. संजय येडे, प्रा. दिपा कान्हेगावकर, डाॅ. शितल काळे, प्रा. मयुर दलाल आदी मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन, राष्ट्रीय, विद्यापीठ गीताने झाली. मंडळाच्या स्वायत्त महाविद्यालयाच्या २०२२-२३ सत्रातील बीपीईएस, बीपीएड, एमपीएड, बीएससी, एमएससी,बीसीए, एमसीए, बीबीए, एमसीए व योग, बी-व्होक, एम-व्होक शाखेतील तब्बल १०१९ गुणवंतांना पदवी देण्यात आली. यामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १९ सुवर्ण, १६ राैप्य, १८ कांस्य व २२ प्रमाणपत्रासहीत पदवी देत सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. ललित शर्मा यांना आचार्य पदवी देत सन्मानित करण्यात आले. नंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरीता शुभच्छा दिल्यात. कार्यक्रमाला मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, एड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, कुस्ती विभागप्रमुख विदर्भ केसरी प्रा. संजय तिरथकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकवर्ग माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. संचलन व आभार प्रा. डाॅ आरजु अशोक रोडे व प्रा. सिद्धार्थ कृष्णराव गणवीर यांनी केले. दीक्षांत समारंभाचा समाराेप पसायदानाने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा. आशिष हाटेकर व त्यांच्या चमूने अथक परिश्रम घेतले.

मंडळ नव्हे 'मिनी इंडिया' श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ शिक्षण, क्रीडा आणि संस्कृतीचा अविरतपणे वारसा सांभाळत आहे ज्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहाेत. मागील अनेक दशकांपासून देशातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थी शिक्षण येथे शिक्षण घेत स्वत:ला सिद्ध करीत आहेत. मंडळाची शिस्त, संस्कार, प्रशिक्षण आणि शैक्षणिक धाेरण येथे शिकत असलेल्या विविध राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना घट्ट करीत आहे. एक मात्र आदर्श संस्था ज्याला खèया अर्थाने मिनी इंडियाचे स्वरूप लाभले आहे हे आपण सर्वांकरीता अभिमानास्पद आहे.

आयकेएस सेेंटरचे कार्य प्रभावी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्थापनेपासूनच भारतीय पारंपारीक खेळ, प्रशिक्षण आणि संस्कृतीचा प्रचार प्रसार करीत आहे. मंडळामध्ये नव्याने स्थापीत इंडियन नाॅलेज सिस्टम सेंटर (आयकेएस) भारतीय संस्कृतीच्या प्रचार प्रसाराकरीता एक सक्षम माध्यम ठरले आहे. आजच्या शिक्षण क्षेत्राला सांस्कृतिक विचारपीठाची गरज आहे, जेणेकरून आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहातील विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आत्मसात करता येईल आणि देशाला एक आदर्श व्यक्तिमत्व प्राप्त होईल. त्या दृष्टीकाेणातून आयकेएस सेंटरचे कार्य प्रभावी व प्रेरणादायी असल्याचे मत कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.