ज्यांच्यावर पडली ‘ताऊंची’ थाप...ते आहेत यशस्वी आज श्री हव्याप्र मंडळात माजी विद्यार्थी मेळावा ठरला कृतज्ञता सोहळा

5th January 2024

पद्मश्री प्रभाकरराव वैद्य ! एक वादळ, सक्षम नेतृत्व आणि भारदस्त व्यक्तीमत्वासह संवेदशील मनाचा माणूस. ज्यांची आदरयुक्त भीती आजही जगण्याला एक दिशा देते. महाविद्यालयीन जीवनामध्ये बुलेट वरून फिरणाऱ्या ताऊंनी लावलेली शिस्त, संस्कार आणि वेळ पडल्यास पाठीवर पडलेली थाप अनेकांसाठी आशिर्वाद ठरला. मंडळाची माती आणि लाडक्या ताऊंसह येथील प्राध्यापकांनी शिक्षण नव्हे तर आयुष्य कसं जगावं ? कशासाठी जगावं हे शिकवलं. त्यामुळे आज माजी विद्यार्थी मेळाव्यास सहभागी हाेणे म्हणजे ३० वर्षांची तपस्या फलित झाली असल्याचा सूर माजी निष्ठावान विद्यार्थ्यांचा हाेता. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे वर्ष १९९१ ते १९९४ मधील माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयाेजन शुक्रवार दि.५ जानेवारी २०२३ राेजी मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृह येथे पार पडला. विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून आलेल्या निष्ठावान माजी विद्यार्थ्यांनी ३५ वर्षानंतर मंडळाची मातीचा स्पर्श हाेणे म्हणजे एक तप पुर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करीत लाडके ताऊ (पद्मश्री प्रभाकरराव वैद्य साहेब) व श्री हव्याप्र मंडळाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे, माजी विद्यार्थ्यांनी मंडळामध्ये प्रवेश करण्याआधी मंडळाच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक होत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना जयजयकार केला.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालीत डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेश महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ (अल्युमनी) द्वारे आयाेजीत या माजी विद्यार्थी मेळाव्याला अध्यक्ष म्हणून डिसीपीचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी मध्ये प्रा. आर.एस तिवारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डाॅ. अजयपाल उपाध्याय, मंडळाच्या सचिव व अ‍ॅल्युमनी उपाध्यक्ष डाॅ. माधुरीताई चेंडके, प्रा. नाना पाटील, प्रा. डॉ. संजय मराठे, प्रा. डॉ. जयंत गाेडसे, प्रा. डॉ. विकास काेळेश्वर, डॉ. डब्ल्यू. डि कॅनडी, प्रा. डॉ. किशोर खांडवे, प्रा. डॉ. टाॅमी जाेश, प्रा. डॉ. सत्यनारायण शर्मा, डाॅ. सुर्यकांत पाटील, प्रा. डॉ. विलास दलाल, प्रा. डॉ. संतोष इंगोले, प्रा. तुलसी राव वंजारी, विदर्भ केसरी डाॅ. संजय तिरथकर आदी गुरूजन उपस्थित होते. मेळाव्याची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाली. यांनतर माजी विद्यार्थी संजय डागर, नरेंद्र ताेमर शर्मा, संजय धामा, निलिमा देशपांडे, बाबुलालजी, जसविंदर सींग, रविंद्र खत्री, सुरज, शैलेंद्र मिश्रा, विजेंद्र सिंग, गाेवर्धन सिंग, साेनी गुप्ता यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी गुरूपुजन करीत व्यासपीठावर उपस्थित गुरूजनांचा हृदयस्पर्शी सत्कार केला. यावेळी माजी विद्यार्थी वर्गातर्फे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, डॉ. अजयपाल उपाध्याय यांचा स्मृती चिन्ह, शाल देत सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी मेळाव्याकरीता अथक परिश्रम घेणारे माजी विद्यार्थी संघाचे सचिव प्रा. ललीत शर्मा, कोषाध्यक्ष प्रा. आशिष हाटेकर, सहसचिव डाॅ. डब्ल्यु कॅनडी सिंग यांचे माजी विद्यार्थी वर्गार्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला मार्गदर्शन करतांना माजी विद्यार्थी संघाच्या उपाध्यक्ष व श्री हव्याप्र मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके म्हणाल्या, मंडळाचे संस्थापक कै. अंबादासपंतजी वैद्य यांनी राेवलेला संस्काराचा वसा प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य जी यांनी जाेपासला. विद्यार्थी घडविण्यासाठी पद्मश्री वैद्य साहेब यांचेसह येथील सर्व प्राध्यापक वर्गाने घेतलेले परिश्रम आज फलीत झाले. माजी विद्यार्थ्यांनी असाच ऋणानुबंध मंडळाशी जाेपासावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे म्हणाले, डिसीपीचे माजी विद्यार्थी मंडळाचे वैभव असून वर्तमान विद्यार्थ्यांकरीता खरे मार्गदर्शक आहेत. विद्यार्थी मेळावा माध्यमातून माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, सहकार्य महाविद्यालय व संस्थेच्या विकासासाठी महत्वाचे ठरणारे आहेत. आता आपल्या महाविद्यालयाला व मंडळाला क्र्रीडा विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला असून पुढील वाटचालीकरीता माजी विद्यार्थ्यांच्या भक्कम पाठबळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष डाॅ. अजयपाल उपाध्याय यांनी केले. संचालन प्रा. आशिष हाटेकर तर आभार प्रा.विजय राठी यांनी मानले. डाॅ. दिनानाथ नवाथे, डाॅ. प्रतिमा बाेंडे, डॉ. संजय तिरथकर, डाॅ. मनोज काेहळे, प्रा. डॉ. देवानंद सावरकर, प्रा. नाहीद परवीन, प्रा. अमृता, प्रा. प्रियांशू आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग होते.

असाच ऋणानुबंध जाेपासू
आज आम्ही विविध क्षेत्रात यशस्वी आहाेत. याचे श्रेय केवळ आणि केवळ श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व आमचे लाडके ताऊ म्हणजेच पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना जाते. आज तब्बल ३० ते ३५ वर्षानंतर मंडळाच्या मातीचा स्पर्श झाला. हा क्षण आमच्या सर्वांकरीता अविस्मरणीय क्षण असून विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून परत तेच महाविद्यालयीन जीवनाची अनुभूती हाेत आहे. आज श्री हव्याप्र मंडळाचा व्याप वाढला आहे. त्यात मंडळाला प्रामुख्याने डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व आमचे महाविद्यालयाच्या विकासासाठी आमचे सहकार्य व ऋणानुबंध असाच कायम राहील असा विश्वास माजी विद्यार्थी श्री संजय डागर, नरेंद्र ताेमर शर्मा, संजय धामा, निलिमा देशपांडे, बाबुलालजी, जसवींदर सींग, रविंद्र खत्री यांचे सह सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनाेगत व्यक्त करताना सांगीतले