अमरावती दि.१० : कुठल्याही खेळामध्ये याेग्य प्रशिक्षण, साेयी सुविधा मिळाल्या की, यश हमखास मिळते. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील खेळाडूंच्या यशस्वी सातत्यातून हे सिद्ध हाेत आहे. आता त्यात भर पडली ती, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वाॅलीबाॅल स्पर्धेच्या यशाची. मंडळाच्या पुरुष आणि महिला संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. सर्व विजेते खेळाडूंनी मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धे अंतर्गत दि.३ ते ७ ऑक्टाेंबर दरम्यान मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालय येथे पुरूष गटातील व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या. यात आर्ट अँड काॅमर्स महाविद्यालय कुऱ्हा संघाचा पराभव करीत मंडळाच्या पुरुष गटाने अजिंक्यपद पटकावले तर २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे झालेल्या महिला गटाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत इंदीराबाई मेघे महाविद्यालय कळम संघाचा पराभव करीत मंडळाच्या महिला संघाने अजिंक्य पद पटकावले. यामध्ये मंडळाच्या पुरूष व महिला संघाने ३-० अशा फरकाने एकतर्फी विजय खेचून आणला. पुरुष संघामध्ये अनंत कुमार, सुमीत कुमार, मेहूल कुमार, प्रकाश सिंग, प्रणव व पल्लव तर महिला संघामध्ये निशा राणी, रेणुका, तृप्ती, अंजली यांच्यासह इतर इतर खेळाडूंचे दर्जेदार प्रदर्शन पहायला मिळाले. संघाचे प्रशिक्षक डाॅ. विजय पांडे व प्रा. संजय गाेहाळ, प्रा. एरिसटाॅटल यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन विजयी हाेण्यास सार्थकी ठरल्याचे मत दाेन्ही संघातील खेळाडूंनी व्यक्त केले. विजेते पुरूष व महिला संघाच्या सर्व खेळाडूंचे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, परीक्षा विभागप्रमुख व प्रशिक्षक डॉ. विजय पांडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्रशिक्षक, प्राध्यापक व सर्व खेळाडू विद्यार्थ्यांर्ते अभिनंदन करण्यात येत आहे.