रंगातून साकारलेल्या कलाकृती झाल्या बोलक्या... श्री हव्याप्र मंडळात चित्रकला-रांगाेळी स्पर्धा : अनेक कलाकृती ठरल्या लक्षवेधी

September 25, 2023

अमरावती दि.२५ : रंगविलेल्या आकारांतून साधलेली कलाकृती म्हणजे चित्र, अशी चित्रांची सर्वसामान्य व्याख्या, पण मनाच्या अंर्तभूत संकल्पनेतून साकारलेले चित्र हे थेट अंतरंगाला स्पर्श करणारी असतात. अशीच अनुभूती श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या गणेशाेत्सवानिमित्त्य आयोजित चित्रकला व रांगोळी स्पर्धेतून अनुभवयाला मिळाली. चंद्रयान, पर्यावरण, झाडे लावा झाडे जगवा, आत्मनिर्भर भारत, ग्रामीण संस्कृती, राॅकेट सायंन्स, स्त्री शक्ती अशा विविध संकल्पनांवर लहान, मोठ्या स्पर्धकांनी तल्लीनतेने साकारलेल्या कलाकृती अक्षरश: बोलक्या दिसत हाेत्या.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाच्यावतीने श्री गणेशाेत्सवा निमित्त्य कलेच्या दैवताची आराधना म्हणून साेमवार दि.२५ सप्टेंबर राेजी नेताजी सुभाषचंद्र बाेस सभागृह येथे भव्य रांगाेळी व चित्रकला स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या दाेन्ही स्पर्धेला लहाना पासून तर माेठ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध विषयांवर रांगाेळी व चित्रकलेच्या माध्यमातून संकल्पना साकारल्या. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती व डाॅ. विजय पांडे व प्रा. मयुर दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली दु.१२.३० वाजता चित्रकला व रांगाेळी स्पर्धेला सुरूवात झाली.

पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ आणि शारीरीक क्रीयाकलाप अशा तीन विषयावर चित्रकला व रांगाेळी स्पर्धा दाेन तासाच्या कालावधीमध्ये सर्व स्पर्धकांनी आपल्या अंर्तभूत संकल्पनांना सप्तरंगांची छटा देत विविध विषयावर कलाकृती साकारल्यात. सदर स्पर्धेचा निकाल बुधवार दि.२७ सप्टेंबर राेजी घाेषीत हाेणार असून दाेन्ही स्पर्धेतील सर्वश्रष्ठ कलाकृती साकारणाऱ्या तीन स्पर्धकांना राेख पारिताेषिक व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एकुणच देश, समाजाच्या विकासाचा विषय केवळ तज्ञांचा नसून ताे सर्वसामान्यांचा विषय असताे आणि त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असताे याची जाणीव चित्रकला व रांगोळी स्पर्धेत साकारलेल्या जीवंत व बोलक्या कलाकृतीतून पहायला मिळाली. स्पर्धेच्या यशस्वितेकरिता ओंकार परदेशी, आदित्य पाचखेडे, मंथन जांभुळकर, राज्वल मेटकर यांचे अथक परिश्रम सार्थकी ठरले.

साकारलेल्या कलाकृती प्रशंसनीय : डाॅ. विजय पांडे
भारतीय पारंपारीक खेळ, व्यायाम पद्धती, संस्कृती जतना साेबतच कलाकृतींना व्यासपीठ देण्याचे कार्य श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यशस्वीरिता करीत आहे. श्री गणेश विद्येचे आराध्य असून ते कलेचे दैवत आहे. मंडळामध्ये श्री गणेशाेत्सवाची परंपरा ही सामाजिक उपक्रमांची असून चित्रकला आणि रांगाेळी स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धक कलावंतांनी आपल्या बाेलक्या कलाकृतीद्वारे श्री गणेशाेत्सवाला एक उच्चतम स्वरूप दिले आहे. स्पर्धे दरम्यान प्रत्येक कलावंत स्पर्धक हा तल्लीन हाेवून आपल्या संकल्पनांना साकारत हाेता. याची प्रेरणा निश्चीतपणे युवा पीढीला मिळेल असा विश्वास स्पर्धेचे मार्गदर्शक डाॅ. विजय पांडे यांनी व्यक्त केले.